हाक एका कासवाची..

एक दिवस अचानक शार्दूलचा फोन आला, वेळासला कासव महोत्सवाला जायचं का? पण माझं आधीच ताडोबा जंगल सफारी ठरल्यामुळं जाता नाही आलं आणि ती खंत मनात राहीली. पण तुमच्या मनात एखादी गोष्ट ठाम असेल तर ती नक्की पूर्ण होते असा माझा अनुभव आहे. कारण परत दोन आठवड्यांनी त्याचा फोन आला, जायचं का म्हणून. मग मी काय तयारच होतो.

संपूर्ण दोन दिवसाचा प्लॅन तयार झाला आणि मी, शार्दूल, किर्तीकुमार, सागरीका आणि प्राजक्ता शनिवारी रात्री दोन वाजता पुण्यातून निघालो. ताम्हीणीमार्गे हरिहरेश्वर – वेळास असा प्रवास करून सकाळी सात वाजता कासवांची पिल्लं पहायला वेळास किनाऱ्यावर हजर, पण घरट्यातून एकही पिल्लू आले नाही. किती अजब ना, देन दिवस आधीपासून दररोज दहाबारा मग पस्तीस अशी पिल्लं बाहेर आलेली आणि आज काहीच नाही, खुप हिरमोड झाला. पण शेवटी तो निसर्ग आहे.
तिथे पाटील गृहस्थ भेटले, त्यांचा कासव संवर्धनात हिरीरीने सहभाग असतो. त्यांनी ह्या कासव संवर्धनाचे महत्व आणि माहीती दिली. साधारण जून ते नोव्हेंबरच्या काळात ही कासवे समुद्र किनारी अंडी घालायला येतात तेव्हा रोज रात्री किनाऱ्यावर गस्त घालून ज्या ज्या ठिकाणी अंडी घातली आहेत ती एका संरक्षीत ठिकाणी एकत्र करणे हे काम सुरू होते. पुढे पन्नास साठ दिवसांनंतर त्यातून पिल्ले बाहेर यायला सुरवात होते आणि त्यानंतर त्यांचा समुद्रापर्यंतचा प्रवास सुरू होतो.

सकाळचा वेळ हातात होता त्यामुळे तिथल्या खडकांच्या ठिकाणी माझी फोटोग्राफीची मस्त मैफिल जमली. मग तिथून आम्ही वेळासमध्ये जोशी यांच्याकडे राहिलो. ‘येवा कोकण आपलाच आसा’ असं का म्हणतात हे तिथल्या टुमदार कोकणी घरांमध्ये राहिलं कि समजतं.

सकाळचा छान नाश्ता करून पुढे आम्ही बाणकोटचा किल्ला पहायला निघालो. ऊन मस्त डोक्यावर नाचत होतं पण आमचा उत्साह काही मावळत नव्हता. भक्कम बांधीव तटबंदी, अजूनही सुस्थितीत असलेला किल्याचा मुख्य दरवाजा बघून मन सोळाव्या शतकात गेलं. तेव्हा काय सुंदर वैभव अनुभवलं असेल ह्यानं. तटबंदीवरून फिरताना उजवीकडे सावित्री नदीची खाडी, समोर हरिहरेश्वरचा डोंगर आणि अथांग पसरलेला सुमद्रपाहून मन तिथून निघतच नव्हतं.

पण संध्याकाळी कासवांची पिल्लं बघण्याच्या ओढीनं ह्या वास्तूचा निरोप घ्यावा लागला. बाणकोटवरून परत आम्ही वेळासच्या किनाऱ्यावर आलो आणि निसर्गाचा काय चमत्कार, फक्त एकच कासवाचं पिल्लू वाळूतून बाहेर आलं. समुद्रात सोडण्यासाठी पाटील ह्यांनी त्याला किनाऱ्यावर ठेवले आणि फॅशन शो मधल्या शो स्टॉपरसारखा त्या छोट्या पिल्लाचा समुद्राकडे प्रवास सुरू झाला. थोड्या अंतरावर दुतर्फा लोकं कुतूहलाने हे सर्व पहात होती आणि त्याची छबी टिपण्यासाठी माझी कॅमेऱ्यावरची नजर काही हटत नव्हती. समुद्राच्या लाटांवर लाटा त्याच्या जवळ येऊन जणू काही त्याला आपल्याकडेच बोलवत आहेत असं भासत होतं. अजूनही हे दृश्य माझ्या डोळ्यांसमोरून हटत नाहीए.
खुप सुंदर आयुष्य त्याला लाभो असं म्हणून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.

वाटेत हरिहरेश्वराचे दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा मार्गावर असलेला निसर्गाची कलाकारी बघत खुप वेळ थांबलो. हवा आणि समुद्राच्या लाटांमुळे खडकांवर तयार झालेली नक्षी मन मोहवून टाकत होती, भरतीमुळे तो उधाणलेला समुद्र तिथून हलूच देत नव्हता पण शेवटी परत येण्याचं अश्वासन देऊन तिथून पुण्याला यायला निघालो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *