खोल दऱ्या, घनदाट जंगल, बर्फाच्या शिखरावर पडलेली सोनेरी किरणे.. खरंच.. निसर्ग एक जादूगार आहे..

खुप दिवसांपासून हिमालयीन ट्रेक करायचा प्लॅन होता पण कामामुळे जमत नव्हतं. एक दिवस इंस्टाग्रामवर India Hikesची हिमालयीन ट्रेकींगवर पोस्ट पाहीली आणि ट्रेकला जायचंच ठरवून टाकलं. हिमालय म्हणलं कि स्नो आलाच, त्यामुळे त्याचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर-जानेवारीत जायचे ठरवले. हा माझा पहिलाच हिमालयीन ट्रेक असल्यामुळे थोडा सोपा पण निसर्गाची वेगवेगळी रूपं दाखवीणारा देवरीयाताल-चंद्रशीला या हिमालयीन ट्रेकचं बुकिंग केलं. मग सुरू झाली त्यासाठी लागणाऱ्या गिअर्सची खरेदी. डाऊन जॅकेट, फ्लिस जॅकेट, स्नो ग्लोव्ह्ज्, वॉकिंग स्टिक, हेड टॉर्च अशी खरेदी सुरू झाली.माझा ह्या ट्रेकचा मुख्य उद्देश हा हिमालयीन लँडस्केप फोटोग्राफीचा होता. त्यामुळे फोटोग्राफीची बॅग, फिल्टर्स, लेन्सेस, ट्रायपॉड ह्या गोष्टींची सॅकमध्ये भर पडली.

आणि तो जायचा दिवस उजाडला. संध्याकाळच्या विमानाने दिल्ली मग तिथून ट्रेनने हरिद्वारला सकाळी पोचलो.
ह्या ट्रेकसाठी भारतातून वेगवेगळ्या ठिकाणावरून ट्रेकर्स जमले होते आणि आमचा २३ जणांचा ग्रुप सारी ह्या गावी जाण्यास निघाला. अतिशय सुंदर, टुमदार असं हे हिमालयातल्या कुशीतलं सारी आमचे बेसकॅम्प होते. हरिद्वार-हृषीकेश-देवप्रयागवरून १२ तासांच्या प्रवासानंतर आम्ही सारीला पोचलो. ह्या सगळ्या प्रवासात सुरवातीला गंगा आणि देवप्रयागनंतर अलकनंदा नदी काही साथ सोडत नव्हती. देवप्रयागला तर अलकनंदा आणि भागीरथी नदीचा संगम पाहिल्यावर तिथून पायच निघत नव्हते.ह्या संगमानंतरपुढे हि नदी गंगा ह्या नावाने वाहते.

हा संपूर्ण रास्ता नागमोडी वळणांनी, उंचच उंच पर्वत रांगांनी आणि विलोभनीय अलकनंदा नदीने साथ देत जातो. ट्रेकर्स बरोबर गप्पा मारत संध्याकाळी बेसकॅम्पला पोचलो. तिथे आमचा लिडर अरविंद कुमारने हेल्थ चेकअप, ओळख परेड, दुसऱ्या दिवशीच्या सूचना असा संध्याकाळचा भरगच्च कार्यक्रम ठेवला होता. सकाळी लवकर निघायचे असल्यामुळे जेवून लगेच झोपलो.

पहिला दिवस, सारी-देवरियाताल:
उंची: ६,६०० फूट ते ७,८४० फूट
ट्रेकची वेळ: साधारण १.३० तास, ३ कि.मी.

पहाटे मस्त थंडी होती, आजपासून आंघोळीला सुट्टी असल्यामुळे भारीच वाटत होतं. सॅकचे पॅकिंग झाले, बूट, कॅप, जॅकेट्स घालून आम्ही ७.३० ला निघालो. पहिला कॅम्प देवरियातलला होता. साधारण दिड तासांच्या चढाईनंतर आम्ही पहिल्या कॅम्पला पोचलो. हा कॅम्प साधारण ७,८४० फुट उंचीवर आहे.
सुंदर तळे, सभोवताली भरपूर झाडी, त्यावर बागडणारे  वेगवेगळे पक्षी, समोरच ढगांमध्ये लपलेली हिमशिखरे असा स्वर्गातीत नजारा होता. थोडा आराम करून संध्याकाळी सूर्यास्ताची फोटोग्राफी करायला तळ्याला लागूनच असलेल्या डोंगरावर आम्ही गेलो. सूर्यास्त थोडक्यात हुकला पण त्यानंतरच्या रंगांच्या छटांनी मी फार भारावून गेलो. दुलई पांघरल्यासारख्या निळ्या डोंगररांगा मोहवून टाकत होत्या.

एकंदरीत संपूर्ण दिवस खुपच सुंदर गेला होता. संध्याकाळी आमच्या कॅम्प साईटकडे वळलो. थंडी हळू हळू वाढायला लागली होती, जेऊन झोपण्याच्या बेतात होतो तेव्हा कळलं आज ३१ डिसेंबर आहे, त्यामुळे थोडं जागून माझा टेंट पार्टनर सुरीला शुभेच्छा देऊन झोपी गेलो. रात्री तापमान साधारण -२° पर्यंत गेलं होतं.

दिवस दुसरा, देवरियाताल-रोहिणी बुग्याल:
उंची: ७,८४० फूट ते ८,८०० फूट
ट्रेकची वेळ: साधारण ६ तास, ७ कि.मी.

पहाटे पाचलाच जाग आली, टेन्टची चेन उघडून बाहेर आलो आणि पाच मिनिटे स्तब्धच उभा, काळ्या ढगांच्या मागे लपलेली ती हिमशिखरे समोरच अस्पष्ट दिसू लागली होती. पटापट सॅक पॅक केली, ब्रेकफास्ट केला आणि कॅमेरा घेऊन शेजारील छोट्याश्या टेकडीवर पळालो, तिथे मस्त मोठा वॉचटॉवर होता. मग काय त्याच्यावर चढून मस्तपैकि बैठक मारली. आतापर्यंत ती हिमशिखरे छान दिसू लागली होती. पुढच्या कॅम्पसाईटकडे निघायचे असल्यामुळे पटापट फोटोग्राफी उरकून परत टेन्टकडे पळालो. पुढची कॅम्पसाईट साधारण पाच सहा तासांच्या अंतरावर होती. मस्तपैकि चढण, घनदाट जंगल, थोडा मैदानी प्रदेश, कडेला वाहणारा गार पाण्याचा ओढा असा झक्कास रूट होता.

वाटेत दुपारच्या जेवणासाठी थांबलो, थंडगार झालेले जेवण घशाखाली काही उतरत नव्हते, अशातच जो हलका स्नो फॉल सुरु झाला तो कॅम्पसाईटला पोहचेपर्यंत सुरु होता. मग पटापट पॉन्चो, रैनसूट घालायची गडबड सुरु झाली. हा माझा स्नो फॉलचा पहिलाच अनुभव होता. हवेतला गारवापण वाढायला लागला होता त्यामुळे माझा कॅमेरा हळूहळू सॅकमध्ये गुडूप झाला.

दुपारी अडीच पर्यंत आम्ही रोहिणी बुग्याल कॅम्पसाईटला पोहचलो. मस्त चहा पिऊन रिफ्रेश होऊन टेन्टच्या बाहेर पडलो. सर्वात सुंदर कॅम्पसाईट असे हिचे वर्णन करता येईल. समोरच प्रचंड मोठा हिमालय आमचे स्वागत करत उभा होता.

उजव्याबाजूला दाट झाडी, डाव्याबाजूला सपाट मैदान त्यापुढे दगडांच्या भिंती आणि थोड्या थोड्या अंतरावर मोकळी घरे असा सुंदर नजारा निसर्गाने मांडून ठेवला होता. कॅमेरा तयारच होता, माझा टेन्ट पार्टनर सुरी बरोबर फोटोग्राफीसाठी बाहेर पडलो. थोड्यावेळाने बाकीचे ग्रुप मेंबर्स आले, त्यांच्याबरोबर ग्रुपफोटो काढून टेन्टकडे परतीचामार्ग धरला. आम्ही हिमालयाच्या पायथ्याशीच असल्यामुळे थंडी मस्त वाजायला लागली होती. रात्री गरमागरम जेवण मग गप्पा मारून साडेआठपर्यंत झोपण्यासाठी टेन्टची वाट धरली. झोपण्याच्याआधी आमच्या लीडर कडून सूचना मिळाल्या ६.३० – ७.३० – ८.३०

दिवस तिसरा, रोहिणी बुग्याल-चोपटा:
उंची: ८,८०० फूट
ट्रेकची वेळ: साधारण ६ तास, ७ कि.मी.

मस्तपैकी पहाटे ५.३० उठलो, तोंडधुवायला पाण्याच्या ड्रममध्ये हात घातला तोच जोरात ओरडलो, रात्रीच्या थंडीमुळे पाण्याचा बर्फ झाला होता. पाच मिनिटे बाजूला होऊन हात चोळत बसलो. पटापट आवरून आमच्या कॅम्पसाईट समोरच सूर्योदय होणार असल्याने मी माझा कॅमेरा, ट्रायपॉड, फिल्टर्स घेऊन शेजारची छोटी टेकडी गाठली. पण सकाळचे थोडे ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्योदय मनासारखा झाला नाही. मला असे वाटते कि जेव्हा वातावरण असे खराब असेल तेव्हा फोटोग्राफीच्या चांगल्या संधी निर्माण होतात. समोरच ढगांच्यामागे लपंडाव खेळणारा हिमालय, त्याच्यासमोर असणारे आमचे छोटे टेन्ट्स, आकाशात दिसणाऱ्या गडद निळसर छटा असा सुंदर नाटकीय सीन माझ्यासमोर होता. आणि मी अक्षरशः त्यात रंगून गेलो होतो.

७.३० ला ब्रेकफास्टची वेळ झाली त्यानंतर सॅक आवरून एक ग्रुप फोटो काढला आणि ८.३० ला पुढच्या कॅम्पसाठी पावले टाकायला लागलो. आज शेवटची कॅम्पसाईट चोपटाला जायचे होते. थोडे पुढे गेल्यावर निसर्गाने भुरभुऱ्या बर्फाचा गालिचा अंथरला होता. साधारण ५-६ तासाच्या ह्या ट्रेकमध्ये दर तासाला वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गसौंदर्य दिसत होते.

थोडी चढण थोडा उतार पार करत साधारण १२.३० ला आम्ही जेवायला थांबलो. अन्न फ्रिजमध्ये ठेवल्यासारखे गार होते हे सांगायलाच नको. अचानक आमच्या गाईडने कोल्ह्याची पळणारी जोडी दाखवली.परत सॅक पाठीवर घेतली चालायला सुरुवात करणार तोच स्नोफॉल सुरु झाला. परत सॅक मधले रेन जॅकेट, पोंचो अंगावर घालून पुढचा प्रवास सुरु झाला. ह्या रूटवर सगळीकडे स्नोफॉल झाल्यामुळे पांढऱ्या आणि करड्या रंगाचे अस्तित्व जास्त होते. खरंच आपण एका वेगळ्या विश्वातून चालतोय असे वाटत होते.

२ ते ३ तासाच्या चालीनंतर आम्ही चोपटा ह्या कॅम्पसाईटला पोचलो. संपूर्ण कॅम्पसाईट पांढऱ्या शालीखाली विसावल्या सारखी दिसत होती. आमच्या सॅक टेन्ट्समध्ये ठेऊन सूर्यास्ताची फोटोग्राफी करण्यासाठी लगेच बाहेर पडलो.
पण ह्यावेळेस मनासारखा सूर्यास्त झाला नाही. शेवटी अंधार पडल्यावर कॅम्पसाईट गाठली. चंद्रशिला समिटसाठी उद्या पहाटे तीन वाजता निघायचे असल्यामुळे रात्री ७.३० लाच जेऊन झोपी गेलो. आजचे रात्रीचे तापमान -२° होते.

दिवस चौथा, चोपटा-चंद्रशिला समिट:
उंची: ८,८०० फूट ते १२१०० फूट
ट्रेकची वेळ: साधारण ८ तास, ८ कि.मी.

पहाटे पाचलाच जाग आली, टेन्टची चेन उघडून बाहेर आलो आणि पाच मिनिटे स्तब्धच उभा, काळ्या ढगांच्या मागे लपलेली ती हिमशिखरे समोरच अस्पष्ट दिसू लागली होती. पटापट सॅक पॅक केली, ब्रेकफास्ट केला आणि कॅमेरा घेऊन शेजारील छोट्याश्या टेकडीवर पळालो, तिथे मस्त मोठा वॉचटॉवर होता. मग काय त्याच्यावर चढून मस्तपैकि बैठक मारली. आतापर्यंत ती हिमशिखरे छान दिसू लागली होती. पुढच्या कॅम्पसाईटकडे निघायचे असल्यामुळे पटापट फोटोग्राफी उरकून परत टेन्टकडे पळालो. पुढची कॅम्पसाईट साधारण पाच सहा तासांच्या अंतरावर होती. मस्तपैकि चढण, घनदाट जंगल, थोडा मैदानी प्रदेश, कडेला वाहणारा गार पाण्याचा ओढा असा झक्कास रूट होता.

दिडएक तास फोटोग्राफी करून त्या उत्तुंग हिमालयाला परत यायचे आश्वासन देऊन परतीचा मार्ग धरला. ह्या चार पाच दिवसांमध्ये आम्ही तेवीस जणांनी घालवलेले एकएक क्षण डोळ्यासमोर तरळत होते.

Comments

  1. Reply

    this is test comment

  2. Reply

    yogesh test comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *